HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये असेही काही राग गायले/वाजवले जातात जे मूळतः कर्नाटकी राग म्हणून प्रचलित व प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकी व हिंदुस्थानी ह्या अगदी दोन भिन्न शैली असूनही हे कर्नाटकी शास्त्रीय संगीतातले राग जेव्हा आपल्या हिंदुस्थानी संगीतामध्ये गायले/वाजवले जातात तेव्हा त्यातले बरेचसे राग अगदी सहज विलीन झालेले दिसतात. आज आपण अशाच एका रागावर लक्ष केंद्रित करतोय. रागाचे नाव आहे हंसध्वनी.

हंसध्वनी हा एक अतिशय सुमधुर व रंजक असा राग आहे. कर्नाटकी संगीतातला जरी हा राग असला तरी हा राग आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये पण खूप लोकप्रिय झालेला आहे. एक नजर टाकूया ह्या रागातील स्वररचनेवर :-

हंसध्वनी रागातील सर्व स्वर शुद्ध आहेत. हा एक ओडव-ओडव जातीचा राग आहे. म्हणजेच ह्या रागात आरोह-अवरोहामध्ये प्रत्येकी 5-5 स्वर आहेत. ह्या रागामध्ये मध्यम व धैवत हे दोन्ही स्वर वर्ज आहेत. रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा हा राग आहे. ह्या रागात एक प्रकारचा अवीट गोडवा व रसाळपणा आहे.

हिंदुस्तानी संगीतातील शंकरा रागाचं कर्नाटकी संगीतातील parallel version म्हणजे हंसध्वनी, असेही मानले जाते. परंतु शंकरापेक्षा हंसध्वनी रागाचं एक नक्कीच निराळं अस्तित्व आहे. तस पाहिलं तर शंकरा रागातील शुद्ध धैवत हंसध्वनी रागात वर्ज होतो. पण हा फक्त इतकाच फरक नाहीये. हंसध्वनी रागात ज्या प्रकारे स्वरांवर आपण ठेहराव करतो त्यातून हा राग शंकरा रागापासून खूप वेगळा होतो.

ह्या रागातील सर्वात महत्वाचा स्वर म्हणजे ह्यातील शुद्ध रिषभ. ह्या स्वरावर बराच ठेहराव करता येतो. निरनिराळ्या प्रकारे ह्या शुद्ध रिषभावर ठेहराव केला कि बहार येते. हंसध्वनी रागाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे ह्यातले खास कर्नाटकी शैलीचे लालित्यपूर्ण स्वरलगाव. ह्या रागात ज्याप्रकारे स्वरांना कंपित व आंदोलित केले जाते त्यामुळे ह्या रागाचे सौंदर्य अधिक खुलते. हंसध्वनी रागाचे काही रागवाचक आलाप :-

'प नि सा रे ग रे, ग रे नि प सा, प नि सा ग रे, गs प, ग प निs प, प निs सा, ग प नि सा नि प ग (रे) सा रे ग रे, ग निs प गs (प) रे, सा रे ग रे नि प (नि) सा.'

हंसध्वनी हा खूप वेळ खेचून गायचा राग नाही. ह्या रागामध्ये विलंबित ख्याल अभावानेच ऐकायला मिळतात. जास्ती ह्या रागामध्ये मध्यलयीच्या व द्रुत रचनाच म्हंटल्या जातात. आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात हंसध्वनी सादर करताना त्यात खास कर्नाटकी ढंगाने आंदोलने व कंपने देऊन स्वरांना फिरवले तर हा राग निश्चितपणे खूप जास्त रंगतदार होतो व तो एक वेगळीच उंची गाठतो.

श्री. समीर अभ्यंकर.

Comments

Popular posts from this blog

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY