HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY

सकाळच्या वेळचा एक आक्रमक व उत्तरांगप्रधान राग म्हंटलं की चटकन मनात येतो तो म्हणजे 'हिंडोल'. ह्या रागाचे नाव हिंडोल का ठेवले असावे ते नाही माहित. पण ह्या रागाची खासियत म्हणजे ह्यात स्वर असे लावले जातात की जणु एक स्वर दुसऱ्या स्वराच्या हातात हात घालुन झोकेच घेत आहेत असे वाटते. स्वर किती सुंदर हिंदोळत येतात ह्या रागात. आणि म्हणूनच कदाचित ह्या रागाचे नाव हिंडोल पडले असावे असे मला वाटते. हिंदोळत डोलतो म्हणून हिंडोल.....

हिंडोल हा एक अोडव - अोडव जातीचा राग आहे. ह्या रागात रिषभ व पंचम हे स्वर वर्जित आहेत. ह्यात मध्यम तीव्र आहे तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. शुध्द निषाद ह्या रागात जरी असला तरी त्यावर ठेहराव नाही व त्याचा वापर तसा क्वचितच होतो. त्यामुळे मी ह्या रागाकडे basically (सा ग मा ध) चार स्वरांचा राग म्हणूनच पाहतो. मिंडकामाने सहज व स्वाभाविकपणे शुद्ध निषाद जितका येऊ शकेल तितका जरूर घ्यावा पण त्याचा अट्टाहास टाळावा अन्यथा सोहनी सारख्या रागांच्या जवळ हा राग जाऊ शकतो. 

हिंडोल रागाचा वादी स्वर धैवत आहे तर संवादी स्वर गंधार आहे. उत्तरांगात रागाचा वादी असल्या कारणाने स्वाभाविकच हा राग उत्तरांगप्रधान आहे. मुख्य ठेहराव अर्थातच षड्जावर केला जातो. हिंडोलची खासियत म्हणजे ह्या रागात आपण प्रत्येक स्वराला त्याच्या वरील स्वराचा कण घेऊन लावतो. हे सर्व अखंड मिंडकामाने केले जाते. अशा स्वर लगावांमुळे हिंडोलमध्ये स्वर नेहमीच एकमेकांच्या हातात हात घालून झुलत विहरताना दिसतात. आणि त्यामुळे शुद्ध निषादाचा अल्प वापर केला तरी हिंडोलचा डौल टिकून राहतो.

हिंडोल रागातील काही आलाप :-
'माग (मा)सा, सा (मा)ग मा (ध)मा (ध)ग, (ध)मा (नि)ध सां, गं सां (सां)ध, (सां)मा (नि)ध सां (सां)ध मा ग, (मा)सा (मा)ग मा ग, माग (मा)सा'.

हिंडोल हा बराच वेळ सादर करायचा राग नाही. ह्या रागात विलंबित ख्याल अभावानेच एेकायला मिळतो. जास्त करून ह्यात मध्य व द्रुत रचनाच सादर केल्या जातात. अतिशय ताकदीचा आणि आक्रमक असा हा हिंडोल प्रवाहीपणे व आटोपशीर वेळेत सादर केला तर तो श्रोत्यांवर प्रचंड प्रभाव सोडून जातो ह्यात काही शंका नाही.

श्री. समीर अभ्यंकर.

Comments

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)