ENJOY THE RAINS WITH MIYA MALHAR


सर्वत्र अंधारून आले, मेघांची दाटी झाली, सोसाट्याचा वारा सुटला आणि धुवाधार पाऊस पडायला लागल्यावर नेमका त्याचवेळी दूर कुठून तरी भीमसेनजींचा 'मिया मल्हार' कानावर पडावा. अा हा हा हा !!! .....काय माहोल तयार होतो म्हणून सांगू. केवळ अवर्णनीयच. पावसाळा सुरु झाला कि सहाजिकच ह्या ऋतूमध्ये खास गायल्या जाणाऱ्या 'मिया मल्हार' रागाचे वेध लागतात.

आपल्या शास्त्रीय संगीतात जसे प्रत्येक वेळेनुसार राग आहेत त्याचप्रमाणे काही राग हे seasonal हि आहेत. हे राग त्या त्या ऋतूंमध्येच सादर करायची प्रथा आहे. वर्षा ऋतू म्हंटलं कि 'मल्हार' चे अनेक प्रकार ऐकायला मिळतात. मुळात मल्हार हे एक 'अंग' आहे. 'म रे प' व कोमल निषादाला लागून शुद्ध निषाद लावून षड्जावर 'नि् नि सा' विसावणे हि दोन्ही मल्हार अंग आहेत. प्रत्येक मल्हारच्या प्रकारात ह्यातील एकतरी phrase असतेच. सर्वच मल्हारच्या प्रकारांमध्ये एकप्रकारच पाऊसाच वातावरण तयार होते असे म्हटले जाते. परंतु मला स्वतःला खरे पाऊसाचे वातावरण 'मिया मल्हार' रागाने तयार होते असे वाटते. ह्या बहारदार रागाच्या जादुई स्वरांवर आपण एक नजर टाकूया :-

ह्या रागात दोन्ही निषाद आहेत, कोमल गंधार आहे आणि बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. हा संपूर्ण जातीचा राग आहे व ह्याचे स्वरूप वक्र आहे.  

'नि् नि सा, म रेss प, म प ग्ss म रे, सा रे नि सा नि् नि सा, नि सा म रेss प, म प नि्ss म प, म प नि् नि सा, रे नि सा ध नि् म प, नि् नि् प म प नि् प ग्ss म रे, नि सा म म रे सा नि सा रे सा नि् नि सा'. हे मिया मल्हार रागातले काही रागवाचक आलाप आहेत.     

शुद्ध रिषभाला 'म रे प' संगतीमध्ये आंदोलन दिले जाते, तसेच ह्या रागात कोमल गंधाराला व कोमल निषादाला सातत्याने आंदोलित केले जाते. ह्यात रिषभाला मध्यमावरून आंदोलन दिले जाते, कोमल गंधाराला मध्यमावरून आंदोलन दिले जाते तर कोमल निषादाला धैवतावरून आंदोलन दिले जाते. हा राग ऐकताना जे एक धीर गंभीर आणि पावसाळी वातावरण तयार होते त्यात ह्या आंदोलनांचा मोठ्ठा वाटा आहे असे मला मनापासून वाटते.   

आणखीन काही महत्वाच्या गोष्टी :- 

1) 'म प नि् नि सा' बरोबरच काही वेळा 'म प ध नि सा' पण केले जाते. 

2) कोमल गंधाराला शुद्ध मध्यमावरून आंदोलन देताना शुद्ध मध्यमावर किंचित Pause देऊन कोमल गंधाराला आंदोलन दिले तर ते अधिक प्रभावी वाटते असे मला वाटते.

3) कोमल गंधाराला आंदोलन दिल्यावर मध्यमावरून रिषभावर थेट न येता 'म' च्या जागी 'म प म म' म्हणून शुद्ध रिषभावर आलो तर अप्रतिम वाटते. थोडक्यात 'ग् म रे' ऐवजी 'ग् "म प म म" रे' करावे. 

4) कोमल निषादावरून अलगद शुद्ध निषादाला स्पर्श करून षड्ज आपण लावतो त्याचप्रमाणे आधी शुद्ध निषादावरून चटकन कोमल निषादावर येऊन पुन्हा शुद्ध निषाद लावून मग षड्ज लावायचा असेही करता येते. त्याचा impact सुंदर होतो.            

खूप मोठा आवाका असलेला हा राग आहे. अगदी मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत हा राग विस्तारपुर्ण खुलवता येतो. मुसळधार पाऊस पडताना एकीकडे सुंदर निसर्ग अनुभवताना सोबत अप्रतिम 'मिया मल्हार' ची बरसात असेल तर ह्यापेक्षा दुसरा दुग्धशर्करा योग असूच शकत नाही.

श्री. समीर अभ्यंकर.



A short clip of Raag Miya Malhar performed by me in a concert. Listen please 😊

Comments

  1. Waiting to know about more & more ragas

    ReplyDelete
  2. रागाचे सुंदर विवेचन केले आहे।भाषाही रसाळ आहे।उपक्रम यशस्वी होणार व त्यासाठी शुभेच्छा।

    ReplyDelete
    Replies
    1. Vibhavari ji, Thanks a lot for such wonderful comment and good wishes :-)

      Delete
  3. Wow. Lovely Information Sameer. Thanks a ton.

    ReplyDelete
  4. Farach sundar, mahitipoorna vivechan...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY