THE SWEETEST OF MALHAR - THE GAUD MALHAR

'मल्हार' च्या अनेक प्रकारांमधील 'गौड मल्हार' हा एक लोकप्रिय व प्रचलित असा राग आहे. हा राग इतका गोड आहे कि केव्हातरी वाटते ह्या रागाचे नाव 'गौड मल्हार' ऐवजी 'गोड मल्हार' असते तरी चालले असते. हा राग ग्वाल्ल्हेर घराण्याच्या खास रागांपैकी एक आहे. आक्रमक, दमदार तसेच प्रवाही असा हा राग आहे. 'मल्हार अंग' आणि 'गौड अंग' अश्या दोन्ही अंगांच्या मिश्रणातून हा राग तयार झाला आहे.

अगोदर आपण हि दोन्ही अंग नीट समजून घेऊया :-

1) गौड अंग - 'रे ग..रे सा, सा..रे ग म, म प म, म ग म, ग रे ग..रे सा, नि सा रे ग म प म'.

2) मल्हार अंग - 'म रेss प, नि्s नि सा'.

वरील दोन्ही अंगांचे एक चपखल आणि बेमालूम मिश्रण म्हणजेच 'गौड मल्हार' होय.

गौड मल्हार हा एक चलन अंगाचा राग आहे. आता आपण नजर टाकूया ह्या रागातील स्वरांवर :-

गौड मल्हार रागामध्ये दोन्ही निषाद आहेत व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्या रागाचे स्वरूप वक्र आहे. षड्जा व्यतिरिक्त ह्या रागात शुद्ध मध्यमावर व पंचमावर ठेहेराव करता येतो.

ह्या रागातील प्रमुख स्वरालाप व स्वरसंगती :-

'रे ग..रे सा, रे ग म, म प म, ग म ग रे ग..रे सा, नि सा रे ग म, म रेss प, म प धs नि् (नि् सा ध नि्) प, म प नि्s नि सा, रे नि सा ध नि् प, म प ध नि सा ध प म, रे ग म प म, ग रे ग..रे सा'. 

वरील आलापांवरून आपल्याला असे लक्षात येईल कि जरी ह्या रागात 'गौड' व 'मल्हार' अशी दोन्ही अंग असली तरी ह्यात जास्ती भर गौड अंगावर असतो. ह्याचे प्रमाण जवळपास 70% गौड व 30% मल्हार असे म्हणू शकतो. चलन अंगाचे राग शिकवताना मला माझे गुरु पं. यशवंतबुवा जोशी म्हणायचे कि 'पाटा आला कि लगेच वरवंटा आलाच पाहिजे'. ह्या तत्वाने गौड मल्हार मध्ये 'रे ग म' आले कि लगेच पुढे 'ग रे ग..रे सा' येतेच.

आणखीन काही खास महत्वाचे असे :-

1) 'म प नि् नि सा' बरोबरच 'म प ध नि सा' हि केले जाते.

2) मिया मल्हार रागाच्या तुलनेत गौड मल्हार मध्ये 'नि् नि सा' हि phrase अधिक गतिमान आहे. हि phrase घेताना दोन्ही निषादांमध्ये फारसे रेंगाळत नाहीत.

3) 'म प ध नि् प' मध्ये कोमल नि नुसता न लावता 'नि् सा ध नि् ' केले तर अधिक सुंदर वाटते. जसे कि 'म प ध "नि् सा ध नि् " प'.

ह्या रागात एकप्रकारचा नैसर्गिक प्रवाहीपणा आहे. हा प्रवाहीपणा जर राखला गेला नाही तर गौड मल्हार पकड घेत नाही. साखरेसारखा गोड असा हा गौड मल्हार, त्यातील दोन्ही अंगांचा (गौड व मल्हार) योग्य असा समतोल व डौल राखल्यास मैफिलीत हमखास रंग भरून जातो.

श्री. समीर अभ्यंकर.


RAAG GAUD MALHAR PERFORMED BY ME IN ONE OF MY RECENT CONCERT. DO LISTEN 😊

Comments

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY