PATDEEP - THE LESS PREFERRED
आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये असंख्य राग आहेत परंतु काही राग काहीही विशेष कारण नसताना मागे पडत जातात. त्यापैकी एक म्हणजे पटदीप असे मला वाटते.
पटदीप हा दिवसाच्या तिसऱ्या प्रहराचा एक गोड राग आहे. ह्या रागात ग कोमल आहे तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. तसेच आरोहात रिषभ व धैवत वर्ज आहेत तर अवरोहात सर्व स्वर घेतले जातात. ह्यामुळे स्वरांचे combination जरी निराळे असले तरी भीमपलास, मधुवंती, मुलतानी सारख्या रागांप्रमाणेच पटदीप रागातही स्वरांचा क्रम 'नि सा ग म प नि सा' व 'सा नि ध प म ग रे सा' असाच आहे. आणि कदाचित ह्यामुळेच हा राग काहीसा दुर्लक्षित राहिला असावा. अर्थात तसे असले तरी पटदीप रागाचे अस्तित्व नक्कीच नाकारता येणार नाही.
'ग् म प नि, प नि सा ध प, ध म प ग् , सा ग् म ग् रे सा.' हे पटदीप रागातले काही महत्वाचे स्वरालाप.
काहींच्या मते भीमपलासमधला कोमल निषाद शुद्ध केला कि पटदीप होतो. परंतु मला तसे नाही वाटत. कारण फक्त नि शुद्ध करून बाकी सगळा भीमपलासच आहे असे दिसत नाही. त्या एका शुद्ध निषादामुळे सगळ्या स्वरांचे समीकरण बदलते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्यातील कोमल गंधाराचे आंदोलन भीमपलास च्या कोमल गंधाराच्या तुलनेत कमी होते. तसेच भीमपलास मध्ये जो शुद्ध मध्यमावर ठेहराव आहे तो पटदीप मध्ये कमी होतो व ठेहराव पंचमावर केला जातो.
दुसरे असे कि अवरोहात शुद्ध निषाद असला तरी 'सा नि ध प' ऐवजी 'नि सा ध प' अधिक करून केले जाते. तसेच आरोहात ध वर्ज असला तरी 'ग् म प नि, ध नि सा ध प' अशी phrase घ्यायची देखील पद्धत आहे. त्यामुळे ह्या रागाचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येईल कि ह्या रागाचा स्वतःचा असा स्वतंत्र चेहरा नक्कीच आहे.
पटदीप हा तसा खूप वेळ गायचा राग नाही आहे. ह्या रागात विलंबित ख्याल अभावानेच ऐकायला मिळतात. पटदीप मध्ये अधिक करून रचना ह्या मध्यलयीत व द्रुतलयीत ऐकायला मिळतात. पटदीप राग सादर करताना त्यात थोडी गतिमानता ठेवली तर हा राग अधिक पकड घेतो व रंजक होतो.
श्री. समीर अभ्यंकर.
Comments
Post a Comment