SARANG WITHOUT THE SARANG ANG - GAUD SARANG

आज आपण एका सुंदर चलन अंगाच्या रागावर focus करूया. दुपारच्या वेळचा हा एक अतिशय गोड असा राग आहे. नाव आहे 'गौड सारंग'.

'गौड सारंग' हे नाव ऐकताच हा जोड राग आहे कि काय, सारंग चा प्रकार आहे कि काय असे आपल्या मनात चटकन आले असेल. परंतु ना हा जोड राग आहे व ना हा सारंग चा प्रकार आहे. नाही म्हणायला ह्यात 'प रे सा' संगती मध्ये प वरून रे सा वर येताना त्यात शुद्ध म येतो, ज्यामुळे थोडी 'म रे' हि सारंगची छटा डोकावते आहे कि काय असे वाटते. परंतु तसे असले तरी ह्या रागात सारंगचे असे काही विशेष अंग दिसत नाही.
काहींच्या मते ह्यात 'कल्याण' अंग आहे. पण मला स्वतःला असे वाटते कि गौड सारंग हे गौड अंगाचेच एक अतिशय गोड व लोभसवाणे असे रूप आहे. 'गौड जैसा रंग' वरून गौड सा-रंग असा अपभ्रंश झाला असावा असे श्री. अद्वैत गाडगीळ (उत्तम सतारवादक) हे मला मागे एकदा म्हणाले होते, हे त्यांना त्यांचे गुरु उस्ताद शाहिद परवेझ ह्यांच्याकडून कळले.

थोडक्यात काय, तर हा सारंग नसलेला......(गौड)सारंग असेच म्हणता येईल.

एक नजर टाकूया ह्या रागातील स्वरांवर :-
गौड सारंग हा एक संपूर्ण जातीचा व वक्र स्वरूपाचा राग आहे. ह्या रागात दोन्ही मध्यम आहेत व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. गौड सारंगचे अगदी प्रमुख चलन म्हणजे 'नि सा ग रे म ग, प रे सा'. 
ह्या चलनाभोवतीच ह्या रागातील इतर सर्व स्वर फिरत राहतात.

माझे आजोबा पं. एस. के. अभ्यंकर मुंबई आकाशवाणीवर कामाला असताना एकदा पं. शंकर अभ्यंकर (जेष्ठ सतारवादक) ह्यांचे रेकॉर्डिंग होते. त्यांना जेव्हा माझ्या आजोबांनी विचारले, 'शंकरराव कुठला राग वाजवणार?' त्यावर पं. शंकर अभ्यंकर ह्यांनी क्षणाचाही विलंब न करता तोंडाने उत्तर न देता त्यांच्या सतारीवर 'ग रे म ग प रे सा' हि phrase वाजवली. लगेच तेवढ्याने माझ्या आजोबांना ते गौड सारंग वाजवणार आहेत हे कळले. इतक 'ग रे म ग प रे सा' म्हणजे गौड सारंग हे समीकरण पक्के झाले आहे. किंबहुना हे चलन म्हणजे गौड सारंगचा चेहराच !

ह्या रागातील मुख्य न्यास करायचा स्वर म्हणजे ह्यातील शुद्ध गंधार. ह्या स्वराला गौड सारंग रागात खूप महत्व आहे. ह्या रागात दोन्ही मध्यम असले तरी ह्यात शुद्ध मध्यमाचाच वापर अधिक केला जातो. तीव्र म 'प ध मा प', 'ध मा प', 'मा प ध मा प' व 'मा प ध नि सा' अशा प्रकारे वापरला जातो.

ह्या रागाचे काही प्रमुख स्वरालाप :-
'ग रे म ग, प रे सा, नि सा ग म रे ग रे म ग, ग प, प ध मा प म ग म रे ग रे म ग, ग प, मा प ध नि सा ध प, नि ध नि प ध मा प म ग म रे ग रे म ग, रे ग म प रे सा'.


अजून काही महत्वाचे असे :-
1) चलन अंगाचा हा राग असल्यामुळे 'ग रे म ग, प रे सा' ह्या चलनात गंधार सोडल्यास इतर स्वरांवर अतिरिक्त रेंगाळू नये नाहीतर राग भंग होऊ शकतो.

2) ह्या रागाचा अधिक विस्तार करता यावा म्हणून स्वर अति खेचून ह्या रागाचा नैसर्गिक प्रवाहीपणा खंडित होऊ देऊ नका. नाहीतर ह्या रागाचा डौल बिघडून त्याचे मूलभूत स्वरूप हरवून जाते.

गौड सारंग रागात मुळातच नैसर्गिक गोडवा व सुंदरता आहे. असा मैफिलीत अप्रतिम जमलेला गौड सारंग ऐकायला मिळणं म्हणजे लोकांसाठी एक पर्वणीच असते.

श्री. समीर अभ्यंकर.


Raag Gaud Sarang performed by me in a concert at Madgao. Happy Listening 😊

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY