JOG - A BEAUTIFUL NIGHT MELODY

आज आपण एका अतिशय श्रुतिमनोहर रागावर लक्ष केंद्रित करत आहोत. रागाचे नाव आहे जोग.
'जोग' ..... रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा एक सुंदर व आकर्षक राग. तसा हा राग काही फार प्राचीन नाही. ह्या रागाची खासियत म्हणजे ह्यात केले जाणारे मींडकाम. मींडकामाला जोग रागामध्ये खूप वाव आहे.
एक नजर टाकूया जोग रागातील स्वरांवर :-

जोग हा एक ओडव-ओडव जातीचा राग आहे. ह्या रागात रिषभ व धैवत हे स्वर वर्ज आहेत. ह्या रागामध्ये 2 गंधार आहेत, कोमल निषाद आहे व बाकी स्वर शुद्ध आहेत. जोगमध्ये कोमल गंधार आणि कोमल निषाद हे दोन्ही स्वर आंदोलित केले जातात. काही कलाकार जोगमध्ये कोमल निषादाबरोबर शुद्ध निषाद पण वापरतात. जो जोग मी माझे गुरु पं. मुकुंद थत्ते ह्यांच्याकडून शिकलो तो फक्त कोमल निषादवाला जोग. फक्त कोमल निषादाच्या जोगमध्ये पण काही कलाकार (खास करून आग्रा घराण्याचे) तार षड्जावर जाताना केव्हातरी थोडा शुद्ध निषादाचा कण घेवून षड्ज लावतात.

'जोग' चे खरे सौंदर्य त्याच्या 2 गंधारांमध्ये दडलेले आहे असे मला वाटते. ह्या दोन्ही गंधारांच्या जादुई करामतींमध्ये श्रोते हमखास गुंगून जातात. ह्यामध्ये आरोहात शुद्ध गंधार तर अवरोहात कोमल गंधार घेतला जातो. 'ग म (सा) ग्s सा' अशा प्रकारे म वरून कोमल ग लावताना षड्जाचा कण घेतला जातो. असे करून कोमल गंधारावर जास्त वजन देऊन तो अधोरेखित केला जातो. जास्त करून अशा प्रकारेच ह्या रागातील दोन्ही गंधार दाखविले जातात.
परंतु अवरोहात आधी शुद्ध ग लावून त्यावरून मींड घेवून कोमल ग वर येऊन मग षड्जावर स्थिरावयाचे, असेही करता येते व केले जाते. ह्यामुळे दोन्ही गंधारांचे सौंदर्य निश्चितपणे अधिक खुलते.
जोगमध्ये षड्जा व्यतिरिक्त मध्यम व पंचमावर पण चांगला ठेहेराव करता येतो.

ह्या रागातील काही रागवाचक आलाप :-

'नि् ग्s सा, प नि् सा ग, सा ग म, सा ग म प ग म (ग) ग्s नि् ग्s सा. प नि् सा ग म, सा ग म प, ग म नि्s प, प नि् सा, ग् सा नि् प, ग म प नि् प म ग, सा ग म प ग म (सा) ग्s सा'.

सावकाश आलापी करून दोन्ही गंधारांची मजा घेत हा राग सुंदरतेने नटवता येतो. खूप मोठी विस्तार क्षमता असलेला हा राग आहे. खटके, मुरक्यांपेक्षा मींडकाम व आंदोलनांनी जोग राग अधिक बहरतो व समृद्ध होतो हे निर्विवाद आहे.

श्री. समीर अभ्यंकर.

Comments

  1. Mast lihalay. Aamhi shudhha nishad lavto matra panchmavar mukkam talto karan mag to tilang sarkha vatayla lagto aani komal gandhar khoop stress kela tar matra ha rag radaka aani monotonous hoto arthat he maze vaiyaktik pan anubhavatun aalele mat aahe so don't mind

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Vijay ji. I dont mind, in fact its good to know your thoughts.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY