KAMOD - THE FLOWING RIVER

आपल्या शास्त्रीय संगीतात काही चलन अंगाचे राग असतात ज्यामध्ये एका विशिष्ट चलनाभोवती (phrase) राग फिरत राहतो. अश्या रागांमध्ये प्रमुख चलन अंगाच्या तुलनेत बाकी स्वरांना/स्वरालापांना तुलनेने दुय्यम महत्व असते. ह्या प्रकारच्या रागांमध्ये मोडणारा एक राग म्हणजे कामोद.

कामोद हा रात्रीच्या पहिल्या प्रहराचा एक खास राग आहे. ह्या रागाचे स्वरूप वक्र आहे. हा एक संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात 2 मध्यम आहेत व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. कामोद हा ग्वाल्हेर घराण्याच्या खास रागांपैकी एक मानला जातो. ह्या रागातील स्वरांवर एक नजर टाकूया :-

ह्या रागात सातही स्वर असले तरी षड्ज आणि पंचमाशिवाय अन्य कुठल्याही स्वरांवर न्यास करता येत नाही. कामोद रागातले अगदी प्रमुख चलन म्हणजे 'रे प, ग म प ग म रे सा.' ह्या चलनाभोवती बाकी सर्व स्वर फिरत राहतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ह्या रागातील काही आलाप बघूया :-

सा रे सा, रे प, ग म प ग म रे सा, म रे प, प ध प, प सा ध प, ग म ध प रे प, ग म प ग म रे सा.

कामोद मध्ये दोन्ही मध्यम असले तरी ह्यात शुद्ध मध्यम जास्ती वापरला जातो. तीव्र मध्यम अधून मधून आणि विशिष्ट संगतीतच वापरला जातो. मा प ध प, प ध मा प, ध मा प इत्यादी प्रकारे तीव्र मध्यम लावला जातो. तसेच पंचमावरून षड्जावर जाताना आपण जसे प ध प प सा करतो त्याचप्रमाणे मा प ध नि सा करून शुद्ध निषाद पण लावू शकतो. अर्थात असे करताना ह्या स्वरांवर न थांबायचे पथ्य पाळावे लागते. कारण तीव्र मध्यम किंवा शुद्ध निषाद हे स्वर लांबवून त्यावर न्यास केल्यास राग भंग होऊ शकतो.

ह्या रागाची शिस्त योग्य प्रकारे राखूनही ह्या रागात कलात्मकतेला निश्चित वाव आहे. त्यात रंजकता आहे. तसा हा बराच वेळ गायचा राग नाही. हा राग मांडताना तो वाढवून बराच वेळ सादर करता येणं हे कुठल्याही कसदार कलाकारापुढे मोठे आव्हानच असते. चटकन पकड घेणारा असा हा कामोद राग मैफिलीत पटकन रंग भरून जातो.   

श्री. समीर अभ्यंकर.

Comments

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY