RAGESHREE - THE LAZY ELEGANCE

'पंचम' सारखा अतिशय महत्वाचा स्वर रागात नसूनही जर त्या रागात शुद्ध मध्यम प्रबळ असेल तर त्या रागाचे एक निराळेच वातावरण तयार होते. अशा प्रकारचे राग सादर करताना तानपुऱ्यामध्ये पण पंचमाच्या ऐवजी मध्यम लावला जातो. ' म सा सा सा ' असे तानपुरे झंकारायला लागले कि आपले मन अतिशय एकाग्र आणि तद्रूप होते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हि मनाची अवस्था लगेच साधली जाते आणि मग चटकन डोळ्यापुढे असे मध्यम प्रधान व पंचम वर्जित राग येतात. जसा सकाळचा ललत, उत्तररात्रीचा मालकौंस इत्यादी. असाच एक राग आहे 'रागेश्री'.

'रागेश्री'..... रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा एक भारावून टाकणारा सुमधुर, आकर्षक व असरदार राग. ह्या रागाच्या स्वरांबद्दल थोडे जाणून घेऊया :-  

रागेश्री मध्ये आरोहात रिषभ व पंचम वर्ज आहेत व अवरोहात पंचम वर्ज आहे त्यामुळे हा एक ओडव-षाडव जातीचा राग आहे. ह्या रागात कोमल निषाद आहे व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. दोन्ही निषाद घेऊन पण हा राग सादर करायची प्रथा आहे. परंतु मी माझे गुरु पं. मुकुंद थत्ते ह्यांच्याकडून फक्त कोमल निषादाचा रागेश्री शिकलो आहे व तोच गातो.   

रागेश्री रागात षड्जा व्यतिरिक्त प्रमुख थांबावयाचे ठिकाण म्हणजे ह्यातील शुद्ध मध्यम. हा मध्यम फारच तेजस्वी आहे. इतर स्वरांवरही आपण कमी अधिक प्रमाणात ठेहेराव करून ह्या रागाचा विस्तार वाढवू शकतो.  

बागेश्री पासून रागेश्री कसा वेगळा ठेवावा :-   

'म ध नि् सा, ध नि् रे सा, रे सा नि् सा नि् ध, म ध नि् सा नि् ध म' ह्या बागेश्री आणि रागेश्री (फक्त कोमल निषादाचा) रागातील काही common phrases आहेत. हे वरील स्वरालाप जर कोणी पुन्हा पुन्हा घोळवत राहील तर रागेश्री आहे का बागेश्री ह्याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच रागेश्रीचा शुद्ध गंधार फार महत्वाचा आहे कारण बागेश्रीमध्ये कोमल गंधार आहे. त्यामुळे वरील आलापांमध्ये शुद्ध गंधाराला समाविष्ट केले कि रागेश्री स्पष्टपणे निराळा दिसतो.  

रागेश्री रागातील काही रागवाचक आलाप :-  

'ध नि् रे सा, ध नि् सा ग, सा ग म, ग म रे सा. ध नि् सा ग म, सा ग म ध, ग म नि् ध, म ध नि् सा नि् ध, सा ग म नि् ध ग, सा ग म ध ग म रे, नि् रे सा'.  

काही वर्षांपूर्वी मी किशोरीताईंचा एक अप्रतिम रागेश्री ऐकला. वाहवा, ताई अशा काही अफाट गावुन गेल्या आहेत कि ऐकताना आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. हि ताकद किशोरीताई आमोणकर ह्यांच्या गायकीची तर आहेच पण त्याचबरोबर हि ह्या रागाची जादू पण आहे.  

रागेश्री हा राग अतिशय विस्तारपूर्वक व शांतपणे मांडता येतो. असे दोन सुंदर मध्यमाला तानपुरे जुळवलेले आहेत, त्या मखरात एक अतिशय तयारीचा आणि कसदार कलाकार जेव्हा एक एक स्वराची मजा घेत हळूहळू बढत करत रागेश्री मांडू लागतो तेव्हा रसिक श्रोत्यांची गानसमाधी लागल्याशिवाय रहात नाही.  

श्री. समीर अभ्यंकर.

Comments

  1. रागे श्री रागाचे अतिशय अप्रतिम स्पष्टीकरण. वा सुंदरच,👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY