SHUDDHA SARANG - THE EVERGREEN BEAUTY

सारंगचे अनेक सुंदर प्रकार आहेत. त्यातील एक अतिशय रंजक व impressive सारंग म्हणजे 'शुद्ध सारंग'. चटकन छाप पडते, हमखास रंगतो असा हा शुद्ध सारंग. काय स्वरांची जादू आहे पहा. मी आजतागायत कुणाचा शुद्ध सारंग पडला असे ऐकलेले नाही. अतिशय रंजक, मनाचा पटकन ताबा घेणारा असा हा राग. इतके सौंदर्य रागात असूनही त्यात कमालीची सादगी आहे, साधेपणा आहे. दुपारच्या वेळच्या ह्या evergreen रागाच्या स्वरांवर एक नजर टाकूया :-

शुद्ध सारंग रागात 2 मध्यम आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. काही कलाकार 2 मध्यमांबरोबरच 2 निषाद पण वापरतात. पण मला माझ्या गुरूंकडून जी तालीम मिळाली आहे ती फक्त शुद्ध निषादाच्या शुद्ध सारंगची. ह्या रागात गंधार वर्ज आहे तर अवरोहात धैवत असला तरी तो आरोहात वर्ज आहे. त्यामुळे हा एक ओडव - षाडव जातीचा राग आहे.

शुद्ध सारंगचे basic design च इतके पकड घेणारे आहे कि त्यातच ऐकणारा रमून जातो. ह्या रागातील खास गोष्ट म्हणजे ह्यातील दोन्ही मध्यमांचा सुंदर मिलाफ. 'रे मा प (रे) म.. रे' सारख्या गोड संगतीने शुद्ध म आणि तीव्र म मध्ये जो संवाद होत राहतो तो केवळ अद्भुत. हा सारंगचा प्रकार असल्याने अर्थातच 'रे म रे' हे सारंग अंग ह्या रागामध्ये पुन्हा पुन्हा येत राहते. शुद्ध सारंग रागात प्रमुख थांबावयाचे स्वर म्हणजे ह्यातील षड्ज आणि पंचम. ह्या रागात शुद्ध धैवत असला तरी तो अल्प प्रमाणात वापरला जातो. पाहूया ह्या रागातील काही रागवाचक आलाप :-

'प नि सा रे म रे, रे मा प, मा प (रे) म..रे, म रे नि रे सा, रे मा प, रे मा प नि (ध) प, ध मा प रे म रे, नि सा रे मा प (रे) म..रे, म रे नि रे सा.'
आणखीन काही महत्वाचे असे -
1) 'रे मा प (रे) म..रे' असे जास्ती प्रमाणात जरी केले जात असले तरी क्वचित प्रसंगी 'नि धप मा म रे' असे एकापुढे एक तीव्र म आणि शुद्ध म लावले जातात.

2) 'रे मा प नि धप' प्रमाणेच 'पनि धसा नि रे सा' अश्या प्रकारे हि शुद्ध धैवत कधी कधी लावला जातो.

भर दुपारी सूर्य माथ्यावर आला असताना, तप्त वातावरणामध्ये सुंदर शुद्ध सारंग कानी पडला तर क्या केहने... हि अनुभूती म्हणजे जशी काही धगधगीत उष्म्यात आलेली एक मंद गार वाऱ्याची झुळूकच !!!

श्री. समीर अभ्यंकर.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY