NAT BIHAG - A BEAUTIFUL AND ATTRACTIVE MIX
बिहागच्या अनेक प्रकारांमध्ये सर्वात impressive आणि भावखाऊ बिहागचा प्रकार म्हणजे 'नट बिहाग'. पहिल्या स्वरापासून मनाचा ताबा घेणारा असा हा एक विलक्षण राग आहे.
'बिहागचा प्रकार' प्रमाणेच आपण ह्या रागाला 'नटाचा प्रकार' म्हणून पण संबोधु शकतो कारण नट बिहाग हा एक जोड राग आहे. असे नट रागाचे अंग असलेले बरेच जोड राग आहेत त्यातील नट बिहाग हा माझा सर्वात आवडीचा राग आहे.
पूर्वांगात एक आणि उत्तरांगात दूसरा अशा प्रकारे काही राग जोडले गेलेले असतात. परंतु नट बिहाग हा अशा प्रकारे जोडला गेलेला नाही. ह्यामध्ये नट अंग हे प्रामुख्याने पूर्वांगात दिसते व खास प्रकारे कोमल निषाद दाखवून उत्तरांगातही अधूनमधून नटाचे अंग दर्शवले जाते. तर बिहाग ह्या रागामध्ये पूर्वांगात व उत्तरांगात असा सर्वत्रच दिसतो. अर्थात तीव्र मध्यम नट बिहाग मध्ये नाही आहे. पण तरी देखिल नट बिहाग रागात बिहाग अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसत राहतो.
ह्या रागामध्ये दोन्ही निषाद आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. नट बिहाग हा एक षाडव संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात आरोहात धैवत वर्जित आहे. दोन्ही निषादांमध्ये शुद्ध निषाद हा प्रामुख्याने वापरला जातो. कोमल निषादाचा वापर तुलनेने कमी असला तरी तो ह्या रागात अतिशय महत्त्वाचा आहे. षड्ज आणि पंचम ह्या व्यतिरिक्त नट बिहाग ह्या रागामध्ये शुद्ध गंधाराला विशेष महत्व आहे.
नट बिहाग रागाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागातील बेहेलावे, खटके व मुरक्या. विशेष करून खटके व मुरक्यांचा सुंदर उपयोग केला तर हा राग अतिशय रंगतो. नटाबरोबर बिहागचे combination जमल्यामुळे नुसत्या बिहाग रागामध्ये असलेले मिंडकाम नट बिहागमध्ये दिसत नाही. बिहागच्या trademark phrases आपल्याला ह्या रागात नक्कीच पहायला मिळतात परंतु नटाच्या संगतीने बिहाग ह्या रागात अधिक गतिमान झालेला दिसतो. तसेच 'गम ग, ह्या बिहागच्या खास phrase मध्ये मिंडे एेवजी 'गम (रे)ग' असा शुद्ध गंधाराला शुद्ध रिषभाचा कण घेऊन खटका दिला जातो.
हा अप्रतिम जोड राग कसा जोडला गेला आहे ते आता आपण पाहूया :-
त्यासाठी आपण दोन्ही रागांच्या phrases ज्या ह्या रागात दिसतात त्यावर नजर टाकूया.
1) नट अंग : 'सारे रेग गम मप', 'पम (प)ग (म)रे सा' तसेच 'ग म नि् ध प' अशा स्वरालापांमधून आपल्याला नट दिसत राहतो.
2) बिहाग अंग : 'प नि सा', 'म प ग म (रे)ग' तसेच 'ग म प नि धप' अशा स्वरालापांमधून आपल्याला बिहाग दिसत राहतो.
ह्या दोन्ही रागांची simultaneously केलेली गुंफण म्हणजेच नट बिहाग हा राग.
नट बिहाग रागातील काही आलाप :-
'पनि रे सा, सारे रेग गम मप मप गम (रे)ग, धप मप मप मपधप मप गम (रे)ग, साग रेम गप ग रे, नि (सा)रे सा, निसारेगमप ग म (रे)ग, ग म प नि धप, प धनि ध प मप मप गम (रे)ग, ग मनि् धप मप गम (रे)ग, ग रेम गप ग रे नि सारे सा'.
नट बिहाग हा राग अनेक कलाकार गातात पण जयपूर आणि आग्रा घराण्याचे कलाकार हा राग फारच सुंदर गातात. आग्रेवाल्यांचा 'कैसे कैसे बोलत' आणि जयपूरवाल्यांचा (खास करून पं. मल्लिकार्जून मन्सूर) 'झन झन झन झन पायल' नट बिहागला एका निराळ्याच उंचीवर नेउन ठेवतात असे मला वाटते. पं. मल्लिकार्जून मन्सूर तर खटके आणि बेहेलावे देऊन हा राग असा काही गात की वाह वा..... असा नट बिहाग एेकणे म्हणजे केवळ एक अप्रतिम श्रवणानुभवच.
श्री. समीर अभ्यंकर.
RAAG NAT BIHAG PERFORMED BY ME IN A CONCERT. PLEASE DO LISTEN TO IT :-)
Comments
Post a Comment