DES - TAILORMADE FOR THUMRIS
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये काही राग असे आहेत की
ते उपशास्त्रीय व सुगम संगीतासाठी अगदी tailormade आहेत. ह्याचा अर्थ ह्या
रागांना अस्सल रागदारीमध्ये महत्व नाही असे अजिबात नाही. परंतु ह्या
रागांची प्रकृती, स्वभाव व त्यातून प्रकट होणाऱ्या रसनिष्पत्तीमुळे हे राग
उपशास्त्रीय व सु गम संगीतासाठी निश्चितपणे जास्त उपयुक्त ठरतात. आज आपण
अशाच एका गोड रागावर लक्ष केंद्रित करतोय. रागाचे नाव आहे 'देस'.
देस
हा राग सादर करायची निश्चित वेळ सांगायची तर हा रात्रीच्या दुसऱ्या
प्रहराचा राग म्हणता येईल. परंतु ह्या रागात उपशास्त्रीय रचना सादर
करण्याकडे कलाकारांचा विशेष कल असतो व उपशास्त्रीय रचना सादर करायला वेळेचे
बंधन असे नसते त्यामुळे हा राग तसा दिवसात केव्हाही सादर केला जातो.
देसमध्ये दोन्ही निषाद आहेत तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्यात
आरोहामध्ये गंधार व धैवत वर्ज आहेत तर अवरोहात सर्व स्वर घेतले जातात.
त्यामुळे ह्या रागाची जाती आेडव - संपूर्ण आहे. देस रागाचा वादी रिषभ तर
संवादी पंचम आहे. रिषभ, पंचम तसेच षड्जावर ह्या रागात आपण ठेहेराव करू
शकतो. देस रागामध्ये दोन निषाद आहेत त्यापैकी शुध्द निषाद फक्त आरोहामध्ये
घेतला जातो तर कोमल निषादाचा वापर हा फक्त अवरोहामध्ये केला जातो.
देस
रागाचेच स्वर असलेला व त्याच्या जवळपास येणारा दुसरा एक राग म्हणजे
तिलककामोद. पण सारखे स्वर असले तरी निराळ्या स्वरांवर न्यास करून तसेच
निरनिराळ्या रागवाचक स्वरालापांमुळे देस व तिलककामोद एकमेकांपासून अगदी सहज
वेगळे दिसतात. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व स्पष्टपणे दिसून येते. अर्थात
त्यासाठी रागवाचक आलाप नीट अंगवळणी पडलेले असायला हवेत. पाहूया तर मग देस
रागातील काही प्रमुख आलाप :-
'निसारेम
ग रे, ग नि सा, पनिसारेम ग रे, रे म प, रेमपनि् ध प, धम ग रे, रेग नि सा,
निसारेमपनि् ध प, मप नि सां, पनिसांरेंनि् ध प, रेमपधम ग रे, मगरेग नि सा'.
मुळातच
देस रागामध्ये ठासून सौंदर्य भरलेले आहे. जेव्हा हा राग उपशास्त्रीय
संगीतात व सुगम संगीतामध्ये वापरला जातो तेव्हा कोमल गंधारासारख्या
रागबाह्य स्वरांचापण ह्यात उपयोग केला जातो. असे मिश्रण खुबीने केल्यास देस
रागाचे सौंदर्य नक्कीच अधिक खुलत जाते. हा खूप वेळ सादरीकरण करावा इतका
मोठा आवाका असलेला राग नाही. तसा देस रागात एक विलंबित ख्याल मला माझे गुरू
पं. मुकुंद थत्ते ह्यांच्याकडुन शिकायला मिळाला. अर्थात हा विलंबित ख्याल
असला तरी त्यात सावकाश आलापी करावी अशा धाटणीचा हा राग नाही. ह्या
ख्यालामध्ये टप्पा अंग असल्याने त्याला एक गतीमानता मिळते व त्यामुळे तो
15-20 मिनिटे सुंदर सादर करता येतो. पण अन्यथा ह्यामध्ये मी विलंबित ख्याल
एेकलेला नाही. ह्या रागात मध्य व द्रुतलयीतील रचनाच प्रामुख्याने एेकावयास
मिळतात.
उपशास्त्रीय
संगीतामध्ये भजन, नाट्य संगीत, ठुमरी ह्या forms मध्ये तसेच
सिनेसंगीतामध्येही देस राग खूप सुंदर प्रकारे वापरलेला आपल्याला पहायला
मिळतो. ह्यात विशेष करून ठुमरी ह्या गीत प्र कारामध्ये देस राग तर फारच
सुंदर दिसतो, त्याची मजाच काही और आहे. शास्त्रीय संगीतामध्येही थोडी
स्वरांची liberty घेऊन जर देस राग लालित्यपूर्णपणे सादर केला तर एक अप्रतिम
स्वरानुभव मिळाल्याशिवाय रहात नाही.
श्री. समीर अभ्यंकर.
Comments
Post a Comment