GORAKH KALYAN - A KALYAN WITHOUT KALYAN ANG
काही वेळा एखाद्या रागाचे नाव अमुक एकच का बरे पडले असावे
असा प्रश्न मनात येतो. पण मग वाटते नावात काय आहे !! माणसाने कलेचा
रसास्वाद घ्यावा, त्याचा आनंद लुटावा. आज अशाच एका रागावर आपण लक्ष
केंद्रित करूया. रागाचे नाव आहे 'गाेरख कल्याण'.
गोरख
कल्याण म्हंटले की हा एक कल्याण अंग असलेला राग असणार असे वाटणे अगदी
स्वाभाविक आहे. परंतु ह्या रागात कल्याण अंग असे काही दिसत नाही. पण मी परत
तेच म्हणेन की नावात काय आहे. रागाचे चलन, तंत्र समजून घेणे मला केव्हाही
जास्त महत्वाचे वाटते. आणि त्याच्यापेक्षा ही महत्वाचे आहे ते म्हणजे
रागाचा आनंद घेणे. गोरख कल्याण राग एेकताना हा आनंद आपल्याला पुरेपुर
मिळतो. एक अतिशय मोहक आणि मनाचा ताबा घेणारा असा हा राग आहे. पाहूया तर मग
ह्या सुंदर रागाची स्वररचना कशी आहे ते :-
गोरख
कल्याण हा रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा एक आकर्षक राग आहे. ह्या
रागामध्ये नि कोमल आहे व बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्यामध्ये गंधार स्वर
वर्ज आहे. गोरख कल्याण रागाचे चलन वक्र आहे. ह्या रागाचा वादी मध्यम आहे तर
संवादी षडज आहे. त्या व्यतिरिक्त शुद्ध रिषभाला पण विशेष महत्व ह्या रागात
दिलेले आढळते.
गोरख कल्याण रागात पंचमाचा वापर :-
काहींच्या
मते ह्या रागात पंचमाला स्थान नाही. परंतु मला जशी तालिम मिळाली आहे त्या
नुसार गोरख कल्याण रागात पंचम स्वराचा अल्प वापर केलेला चालतो. पंचमावर
ठेहराव नाही आहे पण त्याचा वापर रागामध्ये अधूनमधून नक्कीच करता येतो.
'प
ध नि् ध प म रे, म रे नि् ध सा', रे म ध नि् ध म रे, रे ( प ) म रे, म रे
नि् ध सा' अश्या प्रकारे पंचम स्वर ह्या रागात वापरता येतो.
गोरख कल्याण रागातले काही स्वरालाप :-
'म
रे नि् ध सा, ध सा रे म रे, रे म ध ( प ) म रे, म ( सा ) रे सा. ध सा रे म
रे, रे म ध, नि् नि् ध प ध नि् ध म रे, रे म नि् ध प म रे, रे म रे नि् ध
सा'.
ह्या रागाचे स्वरूप
वक्र असल्याने सहाजिकच ह्यात तानक्रिया करताना कलाकाराची कसोटी लागते. असा
हा 'गोरख कल्याण' जर युक्तीने व खुबीने सादर केला तर हा एक कमालीचा ढंगदार
आणि आकर्षक राग आहे.
श्री. समीर अभ्यंकर.
Comments
Post a Comment