MADHUVANTI - A BEAUTIFUL EVENING MELODY
आज आपण एका सुंदर सायंकालीन रागावर लक्ष केंद्रीत करतोय.
ह्या रागात स्वरांचा क्रम जरी मुलतानी, भिमपलास, पटदीप सारख्या रागांसारखा
असला तरी ह्या रागातील निराळ्या स्वरांच्या कॉम्बिनेशनमुळे ह्या रागाचे
माधुर्य तसेच वेगळेपण अगदी निर्विवाद दिसत राहते. कदाचित आपल्यापैकी
काहींनी हा राग ओळखला असेल. होय , मी मधुवंती रागाबद्दलच बोलतोय.
मधुवंती
हा तसा अर्वाचीन राग मानला जातो. ह्या रागामध्ये गंधार कोमल, मध्यम तीव्र
आणि दोन्ही निषाद आहेत. बाकी सर्व स्वर ह्या रागामध्ये शुद्ध आहेत. हा एक
ओडव - संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागामध्ये आरोहात रिषभ व धैवत वर्ज
आहेत तर अवरोहामध्ये सर्व स्वर घेतले जातात. मधुवंतीमध्ये मुख्य ठेहरावाचे
स्वर म्हणजे ह्यातील षड्ज व पंचम. ह्या रागातील कोमल गंधार आंदोलित आहे.
दोन्ही निषादांमध्ये शुद्ध निषादाचा वापर प्रामुख्याने केला जातो.
मधुवंतीमध्ये कोमल निषाद जरी असला तरी त्याचा वापर क्वचितच केला जातो.
जेवणामध्ये लोणचं जसं आपण मध्येच चवीपुरतं घेतो तसाच मधुवंतीमध्ये कोमल
निषाद असावा असे मला वाटते. त्यात एक surprise element हवे. ह्या कोमल
निषादाचा खुबीने वापर करणं हे मधुवंती रागातील एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
मधुवंती रागातील काही रागवाचक आलाप :-
नि सा(मा)ग्s (सा) रे सा, सा ग् मा (प) मा ग् , ग् मा प , ग् मा प नि (सा) ध प, ध मा प ग्s सा ग् मा प ग् मा ग् (सा) रे सा.
कोमल निषादाचा वापर :-
ग् मा प नि सा ध प, ग् मा प नि् ध प ( मा) ग् , सा ग् मा ग् (सा) रे सा. अश्या प्रकारे ह्या रागात कोमल निषाद वापरला जातो.
भिमपलास,
मुलतानी रागांसारखा जरी ह्या रागातील स्वरांचा sequence असला तरी ह्या रागात फार स्वर खेचून विस्तार करू नये. मधुवंती रागाची मांडणी जर प्रवाही
असेल, गतिमान असेल तर तो नक्कीच अधिक रंजक व रंगतदार होतो.
श्री. समीर अभ्यंकर.
Comments
Post a Comment