NAT BHAIRAV - A BEAUTIFUL COMBINATION

आज आपण एका जोड रागावर focus करतोय. जगविख्यात सतारवादक, भारतरत्न पं. रविशंकर ह्यांनी काही रागांची निर्मिती केली त्यापैकी हा एक अतिशय लोकप्रिय असा राग आहे. प्रातःकालिन समयाचा हा एक सुंदर जोड राग आहे. नाव आहे 'नट भैरव'.

नट भैरव... नावाप्रमाणेच ह्या रागाचं रसायन आहे. नट आणि भैरव अश्या दोन रागांचे असलेले एक सुंदर मिश्रण म्हणजेच नट भैरव होय. ह्या रागाच्या पूर्वांगात ( म्हणजेच सा ते म ह्या स्वरांपर्यंत ) नट आहे तर उत्तरांगात (  म्हणजेच प ते सा ह्या स्वरांपर्यंत ) भैरव आहे. एक नजर टाकुया ह्या रागातील स्वरांच्या रचनेवर :-

नट भैरव हा एक संपूर्ण जातीचा राग आहे. ह्या रागात धैवत कोमल आहे तर बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. ह्या रागात मुख्य ठेहरावाचे स्वर म्हणजे ह्यातील षड्ज आणि पंचम. उत्तरांगात भैरव असल्यामुळे अर्थातच ह्यातला कोमल धैवत हा आंदोलित आहे. आता आपण नट व भैरव ह्या दोन्ही रागांचे ह्या रागात कसे मिश्रण केले आहे त्याकडे लक्ष देऊया :-

ह्या रागाच्या पूर्वांगामध्ये आपल्याला नट अंगाचे दर्शन होत राहते. जसे की ' सारे रेग गम रे सा, सारे, रे ग म प '. 
तसेच रागाच्या उत्तरांगामध्ये कोमल धैवत असल्यामुळे त्या भोवती भैरव रागाच्या phrases अगदी स्पष्ट दिसतात. जशा की ' ग म (नि) ध् (नि) ध् s प, गम (नि) ध् s नि सा, धनि सा (नि) ध् s प'.

ह्या दोन्ही अंगांचा सुंदर मिलाफ झाला की एक डाैलदार व उठावदार नट भैरव जमायला वेळ लागत नाही. 

पाहूया नट भैरव रागातील काही आलाप :-
'रेग गम रे सा, रे ग म प, ग म (नि) ध् (नि) ध् s प, ध् मप रे, रेग गम रे सा, (म) रे ग म (नि) ध् s प, ग म (नि) ध् नि सा, निसा रे सा(नि)ध् s प, ध् ध् प म प (म) रे, रे ग म प म (प) ग (म) रे, सा रे सा'.

मला स्वतःला असे वाटते की पूर्वांगात नट असल्यामुळे ह्या रागामध्ये स्वाभाविक पणे नटाचे अंग पटकन establish होते. आणि असे करताना भैरव अंगाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्यामध्ये भैरवचे अंग चांगले अधोरेखित करून दाखविणे फार महत्वाचे आहे. भैरवच्या phrases पुन्हा पुन्हा दाखवल्याने ह्या रागाला एक निराळे वजन प्राप्त होते. असा हा नट भैरव, नट व भैरव ह्या दोन्ही रागांचा योग्य तो समतोल ठेवून सादर केल्यास एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो.

श्री. समीर अभ्यंकर.

Comments

Popular posts from this blog

HANSADHWANI - RAAG WITH A CARNATIC FLAVOUR

SHANKARA - THE TANDAVA OF SWARAS (IN ENGLISH)

HINDOL - BUNDLE OF UNLIMITED ENERGY