SAMANT SARANG - THE RARE ONE
सारंगच्या अनेक प्रकारांमध्ये एक अनवट समजला जाणारा सारंग म्हणुन 'सामंत सारंग' रागाकडे पाहिले जाते. तसा सामंत सारंग अलिकडे फारसा ऐकायला मिळत नाही. गायकाचा कस लावणारा असा हा राग आहे. परंतु जर योग्य अशी भट्टी जमली तर हा एक सुंदर व रुबाबदार राग आहे.
सामंत सारंगमध्ये दोन्ही निषाद आहेत तर बाकी सर्व स्वर ह्यात शुद्ध आहेत. काही कलाकार हा राग फक्त कोमल निषाद वापरुन जरी सादर करत असले तरी ते तार षड्ज लावताना थोडासा शुद्ध निषादाचा कण घेऊनच षड्ज लावतात. आरोहामध्ये गंधार व धैवत वर्ज आहेत तर अवरोहामध्ये वक्र स्वरूपाने शुद्ध धैवत लावला जातो आणि फक्त गंधार वर्जित होतो. त्यामुळे ह्या रागाची जाती वक्र रूपाने ओडव - षाडव आहे.
सामंत सारंग हा दुपारच्या वेळचा एक ढंगदार राग आहे. सारंगचा प्रकार असल्यामुळे अर्थातच ह्या रागात 'सा रे म रे' व 'रे म प नि् प' ह्या phrases मधून सारंग अंग अगदी स्पष्टपणे दिसत राहते. ह्या रागाचा वादी स्वर रिषभ आहे तर संवादी स्वर पंचम आहे. ह्या दोन्ही स्वरांवर तसेच षड्जावर ह्या रागात ठेहेराव करता येतो.
ह्या रागातील सर्वात महत्वाच वैशिष्ट्य म्हणजे ह्यात केला जाणारा शुद्ध धैवताचा उपयोग. सारंग अंग दर्शवताना ह्यात धैवताचा योग्य असा समतोल राखणे आवश्यक आहे. जर शुद्ध धैवताचा वापर फारच क्वचित केला तर हा वृंदावनी सारंगसारखाच भासू शकतो आणि शुद्ध धैवत जास्ती प्रमाणात वापरला गेला तर दुर्गासारख्या इतर रागांच्या जवळ हा राग जाऊ शकतो. त्यामुळे सारंग अंग व्यवस्थित स्थापित करून त्यात खुबीने अधूनमधून शुद्ध धैवताला सामावून घेता आले पाहिजे. इथेच कलाकाराचा खरा कस लागतो. हे जर जमले तर सामंत सारंगच रसायन जमायला वेळ लागत नाही.
पाहूया ह्या रागातील काही महत्वाचे आलाप -
'रेनि् सारे म रे, रेम प, नि्पम रे, ममरेसारेरेसानि सा, रेम प, मपनिसा नि् प, मध प (म)रे, रेमपनि् मपनि्, पमरेमपध पम रे, मरे नि सा'.
शेवटी मी इतकच म्हणेन कि शुद्ध धैवताचा योग्य प्रमाणात ज्याला वापर करता आला त्याला हा राग साध्य झाला. असा हा सामंत सारंग बुद्धिचातुर्याने सादर केला तर तो मैफिलीत नक्कीच चैतन्य आणतो.
श्री. समीर अभ्यंकर.
Comments
Post a Comment